मुंबई : आयसीसीच्या महिला चॅम्पियनशीप मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-0 असा दारूण पराभव केला होता. या पराभवांनंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला स्लो ओव्हर रेटमुळे मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. या पराभवाच्या दुखात असताना टीम इंडियाला आयसीसीने मोठा दंड ठोठावला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसी मॅच रेफरी डेव्हिड गिल्बर्ट यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आणखी एका मोठा झटका बसला आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आहे. या तीनही सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. गेल्या सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले, पण तिचे शतक भारताला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. उभय संघामधील दुसरा वनडे ब्रिस्बेन येथे खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावून 371 अशी विक्रमी धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियाची ही भारताविरुद्धची आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या होती. प्रत्युत्तरात भारताला केवळ 249 धावा करता आल्या आणि 122 धावांनी सामना गमवावा लागला आहे.
मैदानावरील पंच क्लेअर पोलोसाक आणि डोनोव्हन कोच, तिसरे पंच जॅकलिन विल्यम्स आणि चौथे पंच डेव्हिड टेलर यांनी टीम इंडियावर हे आरोप केले होते. या आरोपानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने गुन्हा कबूल केला आणि प्रस्तावित शिक्षा मान्य केली. त्यामुळे आता आयसीसी मॅच रेफरी डेव्हिड गिल्बर्ट यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 10 टक्के दंड ठोठावला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत दोषी आढळला होता. हा विभाग स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत खेळाडूंना निर्धारित वेळेत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो.