बुटीबोरी येथे अवादाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन
नागपूर – नागपुरातील अवादा सौर ऊर्जा प्रकल्पात सुमारे 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र हे 50 टक्के अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून वीज निर्मीती करणारे पहिले राज्य ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील अवादा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या एकात्मिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिलेचे सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. अवाडा कंपनीचे अध्यक्ष विनीत मित्तल, सुरेश सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, राज्यात 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे काम सुरू केले आहे. ही देशातील सर्वात मोठी सौरऊर्जा निर्मितीची योजना आहे. अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रात 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे नियोजन सुरू आहे. आणखी 4 हजार मेगावॅटचे काम प्रगतिपथावर आहे. अवघ्या अडीच वर्षांत सुमारे 20 हजार मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले असून त्यांचे काम सुरू केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अवादा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 13 हजार 650 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच 5 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 51 टक्के महिला कामगारांचा समावेश या कंपनीत करण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राने ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचे धोरण तयार केले. या धोरणाचा राज्याला फायदा होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.