नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला असतानाच अजित पवार राष्ट्रवादी गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज या मतदारसंघातील आपल्या उमेदवारीच्या चर्चेला दुजोरा दिला. त्यांनी उघडपणे सांगितले की, उमेदवारीबाबत मी फार आग्रही नव्हतो मात्र माझ्या उमेदवारीचा निर्णय हा थेट दिल्लीत झाला. अजित पवारांचा फोन आला म्हणून मी तयार झालो. आपण घड्याळ या निशाणीवर लढणार असल्याचे सांगून त्यांनी शिंदे गटाची चिंता वाढवली आहे.
नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र या जागेची उमेदवारी महायुतीने अजून जाहीर केलेली नाही. शिंदे गटाच्या पहिल्या यादीतही नाशिक मतदारसंघाचा समावेश नव्हता. ही जागा कोण लढवणार यावरून भाजपा आणि शिंदे गट यांच्यात मतभेद असताना अचानक या जागेसाठी छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आले. आज छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझी उमेदवारी दिल्लीत ठरली असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली. भुजबळ म्हणाले की, उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रहनव्हता. दिल्लीत बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली.अजित पवारांचा फोन आला म्हणून मी तयार झालो. होळीच्या दिवशी मी मुंबईहून नाशिकला यायला निघालो असता मला पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले. फडणवीस यांना विचारले की, माझ्या उमेदवारीची चर्चा आहे ते खरे आहे का? फडणवीसांनी मला सांगितले हो खरे आहे. त्यामुळे तुम्हालाच उभे राहावे लागेल.
ज्याला उभे राहायचे असते तो चार पाच महिन्यांपासून चर्चा करतो. मात्र माझे नाव अचानक पुढे आल्यानंतर आमची काही लोकांसोबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचली. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा उमेदवारीचा फार आग्रह आहे. जो निर्णय वरिष्ठ देतील, तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार आहोत. महायुतीकडून राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे घड्याळ हिच निशाणी असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाकडून छगन भुजबळांविरोधात होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबत भुजबळ म्हणाले की, मी मराठ्यांना विरोध कधीच केला नाही. मी आरक्षणाला पाठिंबाच दिला. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण नको. वेगळे आरक्षण द्या, ही माझी मागणी होती. ती मान्य झाली आहे.