भिवंडी- यंदाच्या पावसाळ्यातही भिवंडी एसटी आगार खड्ड्यात गेले आहे. परिसरात सर्वत्र चिखल आणि सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे बसमध्ये चढताना – उतरताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या आठ दिवसांत या समस्येवर कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील, सचिव महेंद्र कुंभारे यांनी दिला आहे.
सुरुवातीला आगारात साचणारे पाणी महापालिकेच्या गटारांतून जात होते.परंतु पालिकेने गटारे साफ केलेली नाहीत, गटारांसह रस्त्यांची उंचीही वाढविल्याने आगारात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे.नागरिकांनी तक्रार केल्यानंतर एसटी बस महामंडळाचे ठाणे विभागीय कार्यालय आणि बांधकाम विभाग पावसाळ्यानंतर डांबरी रस्ता बनवतात, परंतु मागील पाच वर्षांपासून आगारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास कोणतीही उपाययोजना केली जात नाही.त्यामुळे या समस्येबाबत शिवसेना ठाकरे गट भिवंडी शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी आगार व्यवस्थापक इम्रान पटेल आणि पालिका आयुक्त अजय वैद्य यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसांत या समस्येवर कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.