उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुस्पष्ट ग्वाही……
मुंबई – अनंत नलावडे
लोकसभेला जशा खोट्या अफवा पसरवल्या गेल्या तशा आता खोटयानाटया प्रचाराला बळी पडू नका… माझ्या बहिणीकडून मनगटाच्या कोपरापर्यंत राख्या बांधल्या जात आहेत.त्यामुळे या लाडकी बहिण योजनेत बसणार्या सर्व बहिणींना काही कमी पडू देणार नाही असा शब्द तुम्ही बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन देतो, अशी सुस्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी शनिवारी श्रीवर्धन येथील जनसन्मान यात्रेत दिली.
महिलांना प्रचंड कष्ट पडतात.कारण त्या दिवसभर राबराब राबत असतात. त्यांनाही वाटतं माझ्यासाठी काहीतरी घ्यायला हवे.तरीही त्या आपल्या इच्छेला मुरड घालतात.मग याच महिलांसाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न माझ्या बहिणींना सबल…सक्षम आणि सुरक्षित करायचे म्हणून ही लाडकी बहिण योजना देत आहे.आज दीड हजार रुपये देतोय म्हणून विरोधक टिका करत आहेत,परंतु जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना काय समजणार दीड हजार रुपयाची किमंत असा खणखणीत टोलाही पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
लाडकी बहिण योजनेची अर्ज भरण्याची ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे.तरीही लक्षात ठेवा… हा चुनावी जुमला आहे असे विरोधक बोलत असले तरी हा चुनावी जुमला नाही असेही ठामपणे स्पष्ट करताना, आज जे तुम्हाला पैसे देतोय त्यात एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. मात्र तरीही जो कुणी चुकीचे करेल त्याला ‘चक्की पिसिंग आणि पिसिंग’ … करायला लावेन त्यांना सोडणार नाही असा सज्जड दमही पवार यांनी आपल्या खास शैलीत बोलताना दिला.
दीड हजार रुपये कायमस्वरूपी मिळावे यासाठी ही योजना सुरूच राहणार असून आज अनेक महिलांना त्यांच्या व्यवसायाला हेच दीड हजार रुपयेही उपयोगी पडले आहेत.त्यात काहीजण ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत.मात्र यांच्या का पोटात दुखत आहे असा संतप्तही सवाल करत, आमच्या कडून तीन सिलेंडरचे पैसे जमा होणार असून मुलींनाही मोफत शिक्षण देणार आहोत.मुलींसाठी, महिलांकरीता योजना देण्यासाठी हे एकमात्र सरकार सक्षम असल्याची ग्वाहीही पवार यांनी दिली.
महाराष्ट्रात क्रांती झाली आहे…बदल झाला आहे…आम्हाला केंद्राचीही ताकद मिळत असून केंद्राचा अनेक योजनांसाठी निधीही येत आहे.आणि याचा फायदा माझ्या महाराष्ट्रासाठी करायचा आहे.कारण आपण एक परिवार आहोत…तुम्ही-आम्ही एकत्र कुटुंब आहोत हे लक्षात ठेवा असे आवाहन करतानाच,राज्य करायचे तर ते रयतेसाठी…बारा बलुतेदारांसाठी करायचे यासाठी आम्ही जनसन्मान यात्रा घेऊन जात आहोत.यात केंद्र व राज्य सरकार हातात हात घालून काम करत आहे असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.
…यासारखे दुर्दैव नाही
लाडकी बहीण योजना फसवी आहे अशी टिका आज विरोधकांकडून करण्यात आली.मात्र ज्यांनी कधी अर्थसंकल्प मांडला नाही त्यांनी टिका करावी यासारखे दुर्दैव नाही,अशा परखड आणि रोखठोक शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना खडे बोल सुनावले. महाविकास आघाडीची सत्ता आली तर ही योजना बंद करु अशी घोषणा विरोधकांनी केली परंतु अजितदादांनी दिलेला वादा हा पक्का असतो त्यामुळे ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असेही तटकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे,महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, ज्येष्ठ नेते मुश्ताक अंतुले, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,आ.अनिकेत तटकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.