मुंबई : बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वास्तव्याला असणाऱ्या बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलं होतं. सरकारकडून तिला लाभही देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पण या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.
अलीकडच्या काळात बांगलादेशी नागरिकांनी भारतात बेकायदेशीर शिरकाव केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली होती. संबंधित आरोपी मागच्या २० वर्षांपासून भारतात वास्तव्याला असल्याचं समोर आलं होतं. आरोपीनं बेकायदेशीरपणे भारत बांगलादेशची सीमा ओलांडली होती. यानंतर त्याने कोलकात्यात जन्म दाखला तयार करून घेतला होता. यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबईवरून पुण्यात आला होता. मुंबईसह, ठाणे आणि भिवंडीत देखील बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचं समोर आलं होतं. संबंधित आरोपींकडे भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्स अशी कागदपत्रं देखील आढळून आले होते. या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.