मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठे यश मिळाले असून, मुख्य आरोपी शिवकुमारला उत्तर प्रदेशातील बहराईच येथून अटक करण्यात आली आहे. भर रस्त्यामध्येच गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. हत्येच्या काही तासांनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून घेण्यात आली. या प्रकरणी हैराण करणारे खुलासे केले जात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना उत्तर प्रदेश आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत शिवकुमारने लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे कबूल केले आहे. त्याने सांगितले की, परदेशात असलेल्या अनमोल बिष्णोईच्या सूचनेवरून बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करण्यात आला.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडलेल्या शूटरला थेट झारखंडमध्ये ट्रेनिंग देण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर शिवकुमार उर्फ शिवा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात शिवकुमारला मदत करणारे चार जण – अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी शिवकुमारला आश्रय देत त्याला नेपाळ पळून जाण्यास मदत केली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन शस्त्रधारी हल्लेखोरांनी सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केला होता. त्यांच्या छातीला लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदत केली, मात्र त्यांना लिलावती रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले होते.