सिंधुदुर्ग – मागच्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून अर्ज भरला व दुसऱ्या दिवशीच भाजपमधून अर्ज भरला. त्यामुळे त्यांनी कितीही वेळा अर्ज भरला तरी जनमत नसेल तर निवडणूक हरतील, अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असलयाचे केसकर यांनी सांगितले. महाविकास आघाडीत तीव्र नाराजी पसरली आहे. आज राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अर्चना घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राजन तेली यांना उबाठा शिवसेना पक्षात देऊन उमेदवारी दिल्यामुळे उबाठाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत. अनेकांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. लवकरच त्या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होतील, असे केसरकर यावेळी म्हणाले.
या मतदारसंघात महिला उमेदवारी दाखल झाली असली तरीही मतदारसंघातील सर्व महिला भगिनी महायुतीच्या पाठीशी आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरण, मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजना, मोफत तीन सिलेंडर, एसटी प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत अशा अनेक योजना महिला भगिनींसाठी महायुती सरकारने आणल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर महिला खुश असून या निवडणुकीत या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावांच्याच पाठीशी ठामपणे उभ्या राहतील, असे केसरकर यांनी सांगितले. सोमवार २८ ऑक्टोबर रोजी महायुतीचा मेळावा सावंतवाडी येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार असून त्यानंतर मंगळवार २९ रोजी महायुतीचे नेते सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.