पालघर : डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी मागील आठ दिवसांपासून कारसह बेपत्ता आहेत. पोलिसांकडून धोडी यांचा सर्वत्र शोध सुरु आहे. याशिवाय महाराष्ट्र-गुजरात सीमावादाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या धोडी यांच्या अपहरणामागे राजकीय कारण आहे का ? यासंदर्भात स्थानिकांकडून चर्चा सुरु आहे.
दरम्यान पोलिसांकडून धोडी यांचा शोध सुरु असताना त्यांच्या गाडीच्या काचा वेवजी डोंगरीजवळ आढळल्याची माहिती आहे. या घटनेबाबत अशोक धोडी यांच्या पत्नी म्हणाल्या की, घटनेच्या दिवशी २० तारखेला अशोक धोडी यांनी मी घरी येत आहे, असे फोन करून सांगितले होते. मात्र त्यानंतर फोन आला नाही आणि तेव्हापासून त्यांचा फोन बंद आहे. माझ्या नवऱ्याचे अपहरण झाले, अशी मला खात्री आहे. पोलिसांनी आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी माझी नम्र विनंती आहे.
अशोक धोडी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीत डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम केले होते. ते मागील आठ दिवसा पासून बेपत्ता आहेत. यावर त्यांच्या कुटुंबाला त्यांचे अपहरण झाल्याचा संशय आहे. २० जानेवारीला अशोक धोडी यांनी पत्नीला डहाणूहून घरी येत असल्याचे फोन करून सांगितले आणि त्यांचा अचानक फोन बंद झाला. त्यानंतर धोडी यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात चकरा मारल्या, पण पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला. याशिवाय अशोक धोडी यांचे अपहरण करून, त्यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय धोडी कुटुंबाने व्यक्त केला.