सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून त्यात २६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालवण आगाराची एसटी बस मालवण ते कोल्हापूर-तुळजापूर नेहमीप्रमाणे मार्गक्रमणाला निघाली होती. ही बस कसाल आगारातून कोल्हापूर-तुळजापूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर उभा असलेल्या कंटेनरला मागून एसटीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये जवळपास २६ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवासाना ओरोस जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अजूनही मिळाली नसून याचा शोध पोलीस आणि एसटी कर्मचारी घेत आहेत. प्रथमदर्शनी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे की कसाल डेपोमधून एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावरून कोल्हापूर-तुळजापूर दिशेने जात होती. ही एसटी बस सर्व्हिस रोड वरून मुख्य रस्त्यावर येत असताना समोर उभा असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली आहे. या एसटी बस मधून जवळपास ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे ही बस उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन आदळली. या अपघातामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताबाबतची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.