रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या १९६ वर्षांच्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह होणार आहे. याचा आनंद केवळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नव्हे तर या परिसरातील सर्वांना होईल. जयस्तंभ येथील (जिल्हा) वाचनालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वेळी हा कार्यक्रम होत असून या इमारत बांधणीसाठी लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले. या वेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, वाचनालयाचे अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन उपस्थित होते.
अध्यक्ष अॅड. पटवर्धन म्हणाले की, १८२८ साली जे. आर. डी. टॉर्च यांनी सुरू केलेल्या या वाचनालयाला लवकरच १९७ वर्षे पूर्ण होतील. महाराष्ट्रातील हे सर्वांत जुने पण सर्वांत अद्ययावत वाचनालय आहे. ज्या शहरातील वाचनालये गजबजलेली असतात, तेथील संस्कृती टिकून राहते व बहरते. आजच्या मोबाइलच्या युगातही २२०० सभासद वाचनालयात नियमित येतात, ही वाचनालयाची ताकद आहे. लोकमान्य टिळकांचे वडील या वाचनालयाचे सदस्य होते. नगर वाचनालयाचे नामकरण स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी केले आहे. या वाचनालयात स्वामी स्वरूपानंद नियमित येत होते. दिवंगत नगराध्यक्ष डॉ. ज. शं. केळकर व आमदार कुसुमताई अभ्यंकर, माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर, डॉ. वि. म. शिंदे, दादा शेट्ये आदी महनीय व्यक्ती या संस्थेचे पदाधिकारी होते. वाचनालयात एक लाख १५ हजारपेक्षा जास्त ग्रंथसंपदा व दुर्मिळ ग्रंथही आहेत.प्राचार्य कै. डॉ. सुभाष देव यांच्या स्मरणार्थ सुखदा देव यांनी एक लाख रुपयांचा धनादेश वाचनालयाकडे सुपुर्द केला. कार्यक्रमाला रत्नागिरीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.