डोंबिवली -डोंबिवलीतील प्रामाणिक रिक्षाचालकांनी रिक्षात विसरलेले प्रवाशांचे सामान, महागड्या वस्तू, पर्स, मोबाईल, पैसे परत केले आहे. डोंबिवलीतील रवी पाटील या प्रामाणिक रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात एका महिला प्रवासी विसरलेले महागडे घड्याळ परत केले. पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक त्या प्रवासी महिलेसह रिक्षा संघटना आणि वाहतूक पोलीसांकडून करण्यात आले आहे.
शुक्रवार 21 जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका महिला प्रवासी रवी पाटील यांच्या रिक्षात बसली. डोंबिवली पश्चिमेकडील रिक्षा थांबा येथे आल्यावर महिला रिक्षा भाडे देऊन निघून गेली. मात्र नंतर आपले महागडे घड्याळ रिक्षातच विसल्याचे लक्षात आले. महिलेने स्टेशनला परत आल्यावर रिक्षाचा शोध घेतला. मात्र ती रिक्षा दिसली नसल्याने विष्णूनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर महिलेने रिक्षाचालक संघटना अध्यक्ष राजा चव्हाण, सचिव भगवान मोराजकर यांना संपर्क केला. त्यापूर्वीच प्रामाणिक रिक्षाचालक रवी पाटील यांनी त्याच्या रिक्षात घड्याळ विसलेले महिलेचे घड्याळ संघटनेकडे दिले होते. महिलेने संघटनेला संपर्क केला असता अध्यक्ष व सचिव यांनी आपले घड्याळ संघटनेच्या कार्यालयात असल्याचे महिलेला सांगितले होते. सायंकाळी वाहतूक पोलीस, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या उपस्थितीत सदर महिलेला प्रामाणिक रिक्षाचालक रवी पाटील यांच्या हस्ते त्यांचे विसरलेले घड्याळ परत देण्यात आले.