नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आमच्याबरोबर विश्वासघात केला होता, जनतेने ते लक्षात ठेवले. त्यानंतर अडीच वर्षांत सरकारने विकासाचे जी कामे केले, मोदी सरकारची मागील १० वर्षांतील सकारात्मक कामे यांच्या जोरावर महाराष्ट्रात हा प्रचंड विजय मिळाला आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागा विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला की, ३० वर्षांच्या निवडणूक निकालाच्या डेटानुसार ज्या पक्षाला लोकसभा निवडणूकीत चांगली मते मिळतात.
त्यानंतर काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीत देखील तोच पॅटर्न पाहायला मिळतो. मग महाराष्ट्रात हा बदल कसा शक्य झाला? यावर शाह म्हणाले की, तुमच्या विश्लेषणाचा पाया चुकीचा आहे आणि तुमची मेमरी देखील शॉर्ट आहे. गेल्या निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना ज्या जागांवर लढली त्या जागा आम्ही लढलो नव्हतो, त्यामुळे आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्याबरोबर होती, त्यामुळे त्यांना बहुमत मिळालं होतं आणि एकूणच आम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी विश्वासघात केला. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेशी देखील विश्वासघात केला.