नवी दिल्ली, 25 मार्च : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्यांनी विजय मिळवला आहे. डाव्यांच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियनने (आयसा) या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पराभव केला.
जेएनयूत तब्बल 4 वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) चा उमेदवार धनंजय याने 2598 मते मिळवून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
जेएनयू विद्यार्थी संघाचा तो पहिला दलित अध्यक्ष ठरला आहे. त्याचा प्रतिस्पर्धी अभाविपचा उमेश सी अजमीरा याला केवळ 1676 मते मिळाली. तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) अविजित घोष यांनं अभाविपच्या दीपिका शर्माचा पराभव करून उपाध्यक्षपद पटकावले.
डावी संघटना बीएपीएसएच्या उमेदवार प्रियांशी आर्य हिनं सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत अभाविपच्या अर्जुन आनंद याचा पराभव केला. डाव्या संघटनांच्या उमेदवार स्वाती सिंह हिचा अर्ज निवडणूक समितीने रद्द केल्यानंतर डाव्या संघटनांनी प्रियांशी आर्य हिला पाठिंबा दर्शवला होता.
संयुक्त सचिवपदी डाव्या संघटनांचा उमेदवार मोहम्मद साजिद निवडून आला. त्यानं अभाविपच्या गोविंदचा पराभव करून विजय मिळवला.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) निवडणुकीत शुक्रवारी 73 टक्के मतदान झाले.
गेल्या 12 वर्षांत झालेल्या निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान होते. दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत 7700 हून अधिक नोंदणीकृत मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मतदानासाठी विविध अभ्यास केंद्रांमध्ये एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती जेएनयूएसयू केंद्रीय पॅनेलसाठी एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, तर स्कूल कौन्सिलर पदासाठी 42 जणांनी नशीब आजमावले. विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदासाठी आठ उमेदवारांमध्ये लढत होती.
जेएनयू विद्यार्थी संघाच्या केंद्रीय पॅनेलमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव आणि सरचिटणीस यांचा समावेश आहे.