पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कतारनंतर आता दुबईमध्ये आपले शैक्षणिक उपकेंद्र सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यात दुबईला उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दुबईसोबतच जॉर्जिया, सौदी अरेबिया, कझाकिस्तान येथेही उपकेंद्रे सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या परिषदेत दुबईमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. हे उपकेंद्र सुरू करण्याबाबत पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला विचारणा करण्यात आली आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुणे विद्यापीठातर्फे सुमारे तीन वर्षांपूर्वी कतार येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले. कतारच्या धर्तीवर विद्यापीठाने इतर ठिकाणी सुद्धा उपकेंद्रे सुरू करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. काही महिन्यांपूर्वी जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तानमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करावे, यासंदर्भात काही संस्थांकडून विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार विद्यापीठाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलले आहे.