मुंबई – 20 वर्षांपूर्वी भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून राजकारणात चमकलेला आणि एका निवडणुकीनंतर राजकीय पटलावरून लुप्त झालेला बॉलिवूडचा तारा गोविंदाने आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भगवा झेंडा हाती घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवराही उपस्थित होते. या पक्षप्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गोविंदा म्हणाले की, 2004 ते 2009 मी खासदार होतो. बाहेर पडल्यावर पुन्हा या क्षेत्रात येईन असे वाटले नव्हते. 2010 पासून 2014 पर्यंत या 14 वर्षांच्या वनवासानंतर आता रामराज्य जिथे आहे त्याच पक्षात प्रवेश करतो आहे. आजच्या दिवशी मी पक्षात प्रवेश करणे ही मला वाटते की, देवाची कृपा आणि प्रेरणा आहे. पक्षात आल्यानंतर मी इमानदारीत जबाबदारी पार पाडेन, हे आश्वस्त करतो. मला कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करायला आवडेल.
आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो, ते कला आणि संस्कृतीचीच प्रतीक आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. साहित्य आणि संस्कृतीला महत्त्व देणारी ही भूमी आहे. बॉलिवूडला जन्म देणारी ही भूमी आहे. फिल्मसिटी जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली आहे. आख्ख्या जगात नाव असलेली ही मॉडर्न अशी फिल्मसिटी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर चांगली कृपा होती. माझ्या आई-वडिलांपासून बाळासाहेब ठाकरेंशी आमचे चांगले संबंध होते. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षात मी अशा पद्धतीने येईन याचा मी कधी विचार केला नव्हता, असे सांगत गोविंदाने मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आम्ही सुरुवातीला जी मुंबई पाहायचो, ती आता आणखी सुंदर दिसते आहे. विकास दिसतो आहे. सौंदर्यीकरण दिसते आहे, एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत हवा, रस्ते, सौंदर्यात मोठी भर पडली आहे. गोविंदा केवळ पक्षाचा स्टार प्रचारक राहणार की लोकसभा निवडणूक लढवणार हे लवकरच कळेल.