मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी गुरमैल सिंह याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश किला कोर्टाने दिले आहेत. तर दुसऱ्या आरोपी धर्मराज कश्यपच्या वयावरून वाद निर्माण झाल्याने कोर्टाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत गुरमैल सिंह व धर्मराज कश्यप या दोघांवर संशय असून ते बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी जीटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. यावेळी धर्मराज कश्यपने आपले वय १७ असल्याचा दावा केला. मात्र, त्याच्या आधारकार्डवर २१ वर्षे असल्याचे आढळून आले.
सरकारी वकिलांनी कोर्टात दोन्ही आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, कारण हत्येचा तपास खोलात जाण्याची आवश्यकता आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, हत्या पूर्वनियोजित होती आणि आरोपींनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. शिवाय, पोलिसांनी आरोपींकडून २८ जिवंत काडतुसे जप्त केली असून, त्यांचा पुढील संभाव्य बळी कोण होता याचा तपास करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. या गुन्ह्यात काही अंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध असल्याचा अंदाज असल्यामुळे पोलीस कोठडी महत्त्वाची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
दुसऱ्या आरोपीच्या वकिलांनी ही घटना दुर्दैवी असून, सिद्दीकी यांचे वैयक्तिक शत्रू असू शकतात असे मत मांडले. त्याचवेळी, सरकारी वकिलांनी हे एक साधारण गुन्हेगार नसल्याचे सांगत, त्यांच्या पूर्ण प्रशिक्षणासह नियोजित हत्येची तपशीलवार तयारी करण्यात आल्याचे म्हटले.