येवला : संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला. नायलॉन मांजाने जखम झाल्यामुळे तब्बल १८ टाके पडल्याची घटना रविवारी घडली आहे. तरीही प्रशासन अजूनही नायलॉन मांजा कडे दुर्लक्ष करीत आहे. येवल्यातील सुमित अरुण भालेराव हा तरुण कोटमगाव रस्त्यावर जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा डोळ्याला अडकल्याने त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल १८ टाके पडले आहे. सुदैवाने या व्यक्तीचा डोळा बचावला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातत्याने येवल्यामध्ये नायलॉन मांजाच्या दुर्घटना होत आहे. यापूर्वी याच शहरांमध्ये एका अभियंताच्या मानेला नायलॉन मांजा ने चिरल्यामुळे दुखापत झाली होती तर आपली आई मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना देखील अशीच दुर्घटना झाली होती असे सर्व होत असताना प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.