पुणे – जहाजावर काम करणारा पुण्याचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. प्रणव कराड असे या तरुणाचे नाव असून हा तरुण गेल्या ६ महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जहाजावरील डेट कॅडेट म्हणून काम करत होता.तो बेपत्ता झाला, तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशियादरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजावर तैनात होता. मात्र, शुक्रवारी फोन करुन कंपनी अधिकाऱ्यांनी तो बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. त्याच्या वडील गोपाल कराड यांनी सांगितले की,गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता आहे. कंपनीने आम्हाला सांगितले की, त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मात्र तो कसा बेपत्ता झाला, याबद्दल आम्हाला अधिक काही माहिती दिली नाही. गुरुवारी आम्हाला त्याचा व्हॉट्सॲप कॉल आला होता. पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार आणि जहाजबांधणी मंत्रालयापर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही पुणे आणि मुंबईतील पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत आहोत.