मुंबई : विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षांसाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही मतभिन्नता झाली तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. अध्यक्ष दोन्ही बाजूंचे ऐकतात. यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन ही लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी अॅड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून, चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते. अॅड. राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडीबदल मुख्यमंत्री फडणवीस हे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चारच जणांना मिळाला आहे. अॅड. नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. लोकशाहीत प्रभावी विरोधी पक्ष हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधिमंडळात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन लोकशाही अधिक सुदृढ होईल. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम या सभागृहात होते. सभागृहातील सदस्य महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सभागृहातील परंपरांचा मान – सन्मान निश्चितपणे कायम राहील. यापुढील काळातही नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात व्यापक जनहिताचे निर्णय होतील. विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा यांची उंची राखत सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी त्यांच्या मागील अडीच वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.