मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ लागतो

0

कराड – लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्या. मात्र, त्यात उदयनराजे भोसलेंची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यावर उदयनराजे यांनी येथे मार्मिक टिप्पणी केली. लग्नातही आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्यावेळी मोठं लग्न असतं, त्यावेळी यादीला बरंच काही असतेच ना? त्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. मोठ्या लग्नाला मोठी यादी असते आणि त्यात वेळ जातोच ना! अशी टिप्पणी उदयनराजे यांनी केली.

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर नाही. त्यातच उदयनराजे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत भेटीगाठी, मेळावे यासाठी ते हजेरी लावत आहेत. त्याअंतर्गत उदयनराजे आज क-हाड तालुक्यातील मेळाव्यासाठी येथे आले होते. त्याचदरम्यान त्यांनी प्रीतिसंगमावर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, हणमंत पवार, एकनाथ बागडी, सुदर्शन पाटसकर आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होतेच. मात्र, त्यांनी देशाचेही नेतृत्व केले. ते देशाचे उपपंतप्रधान होते. त्यांच्या समाधीला अभिवादन करणे हे माझे कर्तव्य समजून आलो. यशवंतराव चव्हाण जेव्हा आमच्या आजी राजमाता सुमित्राराजे भोसले, वडिलांना भेटायला यायचे, तेव्हा त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. एखादा माणूस जेव्हा योग्य दिशेने वाटचाल करत असेल, त्या वेळी आमच्या घराण्याने त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांच्याबरोबर ते कायम राहिले आहेत. त्यांच्या विचारातून दिशा मिळते. लोकांच्या हितासाठी त्यांनी काम केले.

भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्या. मात्र, तुम्हाला भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली नसल्याच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, लग्नातही आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्या वेळी मोठं लग्न असते, त्या वेळी यादीला बरंच काही असतेच ना? त्याच्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. मोठ्या लग्नाला मोठी यादी असते आणि त्यात वेळ जातोच ना!

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech