मुंब्राच्या डोंगरात अडकलेल्या पाच शाळकरी मुलांची सुखरूप सुटका

0

ठाणे – मुंब्रा बायपासवरील खडी मशीन रोड येथे दर्ग्याच्यावर शुक्रवारी सायंकाळी डोंगरावर पाच शाळकरी मुले फिरायला गेली होती. काही वेळाने अंधार झाला. परतीचा मार्ग न मिळाल्याने ही मुले ३०० फूट उंचीवर अडकली होती. त्यात पाऊस सुरू झाल्याने वाट सापडत नसल्याने मुलांनी झाडाच्या खालीच बसून राहण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र डोंगरामध्ये बरसणारा पाऊस, दाट अंधार, निसरडामार्ग या सर्व कठीण परिस्थितीमध्ये बचाव मोहीम राबवणे कठीण जात होते.

पावसाची रिपरिप… किर्रर्र अंधार… निसरड्या वाटा तुडवत तब्बल सात तासांच्या मदतकार्यानंतर पाच शाळकरी मुलांची मुंब्र्यातील दर्ग्यावरील डोंगरातून शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. खेकडे पकडण्यासाठी डोंगरावर गेलेल्या या मुलांची अग्निशमन दल, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी सुखरूप सुटका केली. त्यामुळे बचाव पथकांसह मुलांच्या पालकांचाही जीव भांड्यात पडला. रात्रीच्या अंधारात मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या पालकांच्या डोळ्यात त्यांना पाहताच आनंदाश्रू तरळले.

अखेर सात तास अविरत मदतकार्य राबवून अखेर डोंगरावर अडकलेल्या मुलांची शनिवारी पहाटे तीन वाजता सुखरूप सुटका करण्यात आली. असहदुल शेख (१२), मोहम्मद शेख (११), ईशान शेख (१०), मुन्ना शेख (९) आणि अमीर शेख (११) अशी या मुलांची नावे असून ते सर्व मुंब्र्यात राहणारे आहेत. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech