मुंबई : भाजपाने लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना तिकीट दिलं आहे. गेली दोन टर्म ते खासदार आहेत. गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारालादेखील जोरदार सुरूवात केली आहे. त्यांच्या अर्जानुसार नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे मिळून 28 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया.
उमेदवारी अर्जानुसार नितीन गडकरी यांच्याजवळ 21 बँक खाती आहेत. यामध्ये 49 लाख 6 हजार रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या बँक खात्यात 16 लाख 3 हजार रुपये जमा आहेत.
नितीन गडकरी यांच्याकडे 486 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 31 लाख 88 हजार रुपये आहे. त्यांची पत्नी कांचन यांच्याकडे 368 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याची किंमत सुमारे 24 लाख 13 हाजर रुपये आहे. तसंच त्यांच्याकडे 474 ग्रॅम सोन्याचे वडिलोपार्जित दागिने आहेत, ज्याची किंमत सुमारे 31 लाख 10 हजार रुपये आहे. जर आपण दागिने, कार आणि बँक खात्यांमध्ये जमा केलेली रोख रक्कम समाविष्ट केली तर नितीन गडकरींकडे एकूण 3 कोटी 53 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.