नवी दिल्ली-भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीने गुजरातमधील खवडा येथे ७७५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे.हा प्रकल्प प्रत्यक्षरित्या सुरू झाला असल्याची घोषणा अदानी समूहाने काल केली. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,या प्रकल्पासंदर्भात सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतरच या प्रकल्पाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
अदानी ग्रीन एनर्जीच्या पूर्ण मालकीच्या असलेल्या उपकंपन्यांद्वारे गुजरातमधील खवडा येथे एकूण ७७५ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.संबंधित मंजुरींच्या आधारे २९ मार्च रोजी प्लांट कार्यान्वित करण्याचा आणि वीज निर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला,असे कंपनीने कंपनीने शेअर बाजाराला सांगितले.अदानी समूहाचा एक भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीकडे भारतातील सर्वांत मोठा ऑपरेटिंग रिन्यूएबल पोर्टफोलिओ आहे, जो १२ राज्यांमध्ये पसरलेला आहे.