६८ वा महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

0

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ६ डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचे ५३० नळ, पाण्याचे ७० टॅंकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच स्नानगृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची बाटली आणि बिस्किटेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रांगेत आसन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech