अमरावती – सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६व्या पुण्यतिथी महोत्सवात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंतांना गुरुकुंज मोझरीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण भारतात अशाप्रकारे एखाद्या संत महात्म्याला इतक्या शिस्तबद्धरित्या लाखो भाविकांच्यावर उपस्थित राहिलेल्या भाविकांनी एकाचवेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा देशातील एकमेव कार्यक्रम आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक, राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. एक दिन सारा जगत गुरुदेव सेवामंडल की शिक्षा और दीक्षा पायेंगा।’ या राष्ट्रसंतांच्या भाकितानुसार श्रद्धांजलीला अमेरिका, इंग्लंड, जॉर्जिया, जर्मनी, कॅनेडा, दक्षिण ऑर्फिका इत्यादी देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक व परदेशी नागरिक आर्वजून उपस्थित होते.
गुरुदेव हमारा प्यारा या अर्चना गीताने सुरुवात करण्यातआली. यावेळी राष्ट्रसंतांच्या भव्यदिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द सुरांच्या माध्यमातून लाखो जनसमुदायाला करुन दिल्या गेली. सुमारे दोन तास लाखोचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक व कार्याचा त्यातून भासणार्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता. महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होताच, ठिक 4 वाजून 58 मिनिटांनी शिस्तबद्धरितीने लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक थांबविण्यात येऊन यात्रेतील दुकाने, भोंगे काही वेळाकरिता बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र निरव शांतता पसरली होती. निरव शांततेत अतिशय शिस्तबद्धतेने मौन श्रद्धांजलीचा भावपूर्ण सोहळा पार पडला. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर चलाना भाई नाम गुरुका चलाना तसेच आरती राष्ट्रसंता ही आरती व सामुहिक प्रतिज्ञा करण्यात आली. तसेच यावेळी हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन अशा सर्व धर्माच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरुंकडून करण्यात आल्या.
श्रीगुरुदेव सेवामंडळाचे राज्यातील आजीवन, जीवन शाखा प्रमुख, सर्व प्रचारक, कार्यकर्ते, धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले. तुकडोजी महाराजांनी संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांचे महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठे योगदान आहे.