जळगाव – गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्हात उन्हाचा पारा वरचढ झाला आहे. तापमान ४० अंशाच्या वर गेल्याने लोकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील तापमानाचा पारा एवढा वाढला आहे की लोकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले पन्नास मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील सोळा मृतदेह हे बेवारस असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या विविध भागात आढळून आलेले हे मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवगृहात दाखल केले होते. या सगळ्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आणि रोग प्रतिकार क्षमता कमी झाल्याने तसेच उन्हाच्या तीव्रतेने या व्यक्ती मृत पावले असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या सर्व मृतदेहांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तेथील स्मशानभूमीत रात्रीपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.