राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाहांचे षडयंत्र – संजय राऊत

0

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर पुढील ४८ तासांत सरकार स्थापन करावे लागणार आहे. नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणारा हा वेळ पुरेसा नाही. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागणार आहे. निकालानंतरच्या ४८ तासांत सरकार बनले नाही, तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही, म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाह यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. हे षडयंत्र उधळून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’तून राऊतांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजपा आपले मनसुबे पूर्ण करीत आहे. अमित शाह व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे, असा एकंदरीत डाव दिसतं आहे.

दुसरीकडे निवडणुका जिंकता याव्यात. त्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळा करत आहे. भारतीय जनता पक्ष ज्या मतदारसंघात लढणार आहे, त्या साधारण दीडशे मतदारसंघाच्या यादीत महाविकास आघाडीच्या पक्क्या मतदारांची यादी काढायची आणि खोटे आधार कार्ड, खोटे ओळखपत्र या माध्यमातून दहा हजार बोगस नावे टाकले जात असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. लोकशाहीत हा सर्वात मोठा घोटाळा मतदार यादीचा माध्यमातून होत आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला अशाप्रकारे मदत करत असेल तर मला वाटतं की, या देशातील लोकशाहीची हत्या झाली आहे. अमित शाह हे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. आम्ही मतदारांना जागरूक करू. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. निवडणूक आयोगावर चाल करून जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech