जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज, गुरुवारी झालेल्या चकमकीत सैन्याने ५ जिहादी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार सुरक्षालदांना कुलगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. गुप्तहेरांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या परिसरता शोध मोहिम हाती घेतली. त्यावेळी सर्च ऑपरेशन दरम्यान कुलगाम जिल्ह्यातील कद्दर भागात जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याने यावेळी जवानांनी संशयितांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. परंतु, संशयितांनी सैन्यावरच गोळीबार सुरू केला. यात २ जवान जखमी झालेत. त्यानंतर जवानांनी तत्काळ पोजिशन घेत जिहादी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये आतापर्यंत ५ दहशतवादी ठार झाले असून सैन्याने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान गोळीबारात २ जवानही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान या परिसरात अजूनही गोळीबाराचे आवाज येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.