ठाण्यात बुधवार पासून ३९ वी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला

0

ठाणे : यंदा व्याख्यानमालेचे ३९वे वर्ष असून ८ ते १४ जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात रोज रात्री ठीक ८ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत एकाही वक्त्यांची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या ३८ वर्षांत एकच राहिली आहे. असे वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमलेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ठाणे आणि उपनगराचे लक्ष लागून राहिलेली आणि गेली ३८ वर्षे अखंडीतपणे सुरू असलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ८ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३००वी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पहिले पुष्प गुंफणार आहेत, अशी माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली.

यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३००वी जनशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ८ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून पहिले पुष्पही ते गुंफणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचा असल्याचेही आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर आधारलेली ही व्याख्यानमाला ठाणे जिल्ह्यातील आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांच्या नावाने सुरू असून व्याख्यानमालेला कोणत्याही सेलिब्रिटीशिवाय मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे व्याख्यानमालेत सहभागी झालेला एखादा वक्ता देखील सेलिब्रिटी होतो, अशा शब्दांत श्री.केळकर यांनी व्याख्यानमालेचे महत्त्व विषद केले. या व्याख्यानमालेचा ठाणेकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

९ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यावरण संशोधक कु.प्राची शेवगावकर ‘हवामान बदल: जबाबदारीतून संधीकडे’ य विषयावर व्याख्यान देणार आहेत. १० जानेवारी रोजी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज हे ‘तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. ११ जानेवारी रोजी वैद्य सुविनय दामले हे ‘आजीबाईचा बटवा’ खोलून सर्व वयोगटातील नागरिकांना निरोगी जीवनाचा कानमंत्र देणार आहेत. १२ जानेवारी रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. पारिजात पांडे हे बहुचर्चित ‘कायदा वक्फ बोर्डाचा’ या विषयावर विचार मांडून नागरिकांचे उद्बोधन करणार आहेत. १३ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने हे ‘अटलजींचा वसा आणि वारसा’ य विषयावर विचार मांडणार आहेत. तर व्याख्यानमालेचा समारोप सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे. माधुरी ताम्हाणे या त्यांची खुमासदार मुलाखत घेणार आहेत.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech