दिवाळीच्या सुट्टीत कोकणात ३ लाख पर्यटक येण्याचा अंदाज

0

रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी पर्यटकांनी कोकणला पसंती दिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातून कोकणामध्ये सुमारे ३ लाख पर्यटक दाखल होतील, असा अंदाज पर्यटन विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रिसॉर्टमध्ये १ नोव्हेंबरपासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले आहे. पुढच्या काळातील बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी केली जात आहे. काहींनी तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे निश्चित केले आहे. मुंबई-पुण्यातील धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येतात.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, काशिद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व कुडाळ, निवती, आचरा, तारकर्ली, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते. अथांग समुद्रकिनारा हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. नमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील विविध कलाप्रकार दाखवण्यासाठी काही रिसॉर्टमधून सायंकाळच्या वेळी याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना केवळ शांतता हवी असते. येथील निसर्ग अनुभवायचा असतो म्हणून न चुकता ही कुटुंबे येथील शांत वातावरणाचा अनुभव घेत दिवाळी साजरी करण्यासाठी येतात.

पर्यटकांना येथील सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा, निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना मनोरंजनाचे चार क्षण घालवता यावेत यासाठी कोकणातील संगीत कार्यक्रम, डॉल्फिन, खाडीसफारी यांचे आयोजन पर्यटन व्यावसायिक करतात. समुद्रातील सफर, किनाऱ्यांवरील विविध खेळ, डॉल्फिन दाखवण्याची व्यवस्था यासाठी बोटींची व्यवस्था करण्यापासून पर्यटकांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत. कोकणातील निसर्गाची माहिती व्हावी, येथील जैवविविधता कळावी यासाठी निसर्ग सहलींचे आयोजनही काही निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech