मविआच्या २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर रस्सीखेच सुरू

0

– २०० जागांवर एकमत झाल्याची पवारांची माहिती

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटला असून उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मविआचं जागावाटप आजच फायनल करून १-२ दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीपूर्वी मविआत २०० जागांवर एकमत झालं होते, विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे यासाठी सकाळपासून मविआ नेते बैठकीला बसले आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील आणि इतर नेते उपस्थित आहेत. त्यात आतापर्यंत २६० जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा दिल्या जातील. जागावाटपात काही जागांची अदलाबदल केली गेली आहे. त्यात मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघ जिथे मागील निवडणुकीत काँग्रेसचा आमदार निवडून आला होता ही जागा आता काँग्रेसकडून ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. भाजपाला आणि महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढायचे असा निर्धार मविआने केला आहे. त्यामुळे जागावाटपात तिन्ही पक्षांनी काही जागांवर सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, ठाकरे सेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे.

अशातच साताऱ्यातील कराड येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीत २८८ पैकी २०० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांसाठी बैठकीत चर्चा होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील, या बैठकीत ते निर्णय घेतील आणि त्यानंतर याबाबत आम्हाला सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech