ठाणे – ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. या नवजात बालकांमधील काही मुलांचे वजन कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून याबाबत अहवालही मागवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कळवा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळवा रुग्णालयात मागील वर्षी १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरामध्ये खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाची नऊ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा कळवा रुग्णालयाचा कारभाराने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता या रुग्णालयात एका महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मागील वर्षी ठाणे पालिका प्रशासनाने रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांचे नेमके काय झाले, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.