एस टी महामंडळ अध्यक्षांची घोषणा
मुंबई – अनंत नलावडे
सरळ सेवा भरती २०१९ सालच्या अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार, असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत असून प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबतही निर्णय घेण्यात आल्याचे गोगावले यांनी सांगितले.
या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व आपल्यालाही भेटून त्या प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांनी भेटून यासंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना आपण स्वतः १ ऑक्टबरला झालेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून,या सर्व उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असल्याची माहितीही गोगावले यांनी यावेळी दिली.