अदानीच्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाला साताऱ्यातील 102 गावांचा विरोध

0

सातारा – सातारा जिल्ह्यातील तारळी धरणावर अदानी कंपनीचा ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट (ऊर्जा प्रकल्प) होणार आहे. या प्रकल्पाला या परिसरातील 102 गावांतील गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. या गावांनी तसे ठरावही केलेत. परंतु ग्रामस्थांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी तारळी अदानी प्रकल्प विरोधी कृती समितीने केली आहे.

तारळी अदानी प्रकल्प विरोधी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘तारळी धरणावर होत असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला संपूर्ण तारळे विभागाचा कडाडून विरोध आहे. गेल्या 15 वर्षांपासून या विभागात आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करून कवडीमोल दराने जमिनी खरेदी-विक्री सुरू आहे. यामध्ये अनेक अनधिकृत प्रकार होत आहेत. बाहेरील अनेक श्रीमंत गुंतवणूकदार व स्थानिक दलाल आमच्या शेतकऱ्यांना धमकावून त्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटत आहेत. अगदी 30 ते 40 हजार रुपये एकरपासून आज 3 लाख रुपये एकर अशा कवडीमोल भावाने या जमिनी परस्पर विकल्या जात आहेत.

या जमिनीत अनेक पिढ्या राबलेला आमचा माणूस या मालकीला कायमचा मुकत आहे. सध्या हा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित असतानाही अदानी कंपनीकडून प्रकल्पाच्या जागेवर चाचणी आणि खोदकाम चालू आहे. या परिसरातील आणि आजूबाजूच्या सर्व गावांचा विरोध असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या प्रकल्पाचे काम त्वरित थांबवावे. 12 मार्च तारळे भागातील कळंबे येथे प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात सुनावणीही झाली. त्यात हजारपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. स्थानिकांच्या भावना तीव्र असल्याने प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलेही काम करू नये, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech