नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेसचे (18029) नागपूर जवळ दोन डबे रुळावरून खाली उतरले. यात एस2 आणि पार्सलचा एक डबा आहे. सुदैवाने अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. परिणामी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास कळमना रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर शालिमार एक्सप्रेसचे दोन डबे अचानक रुळाच्या खाली उतरले. एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू आहे. या मार्गावरील काही गाड्या प्रभावित झाल्या आहेत. तसेच काहींचे मार्ग बदलण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.