सिंधुदुर्ग : बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला,असे मत माहीम मतदारसंघाचे नवनिर्वाचित उद्धव ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केले. तर राज ठाकरेंचे आव्हान आम्ही मानतच नव्हतो,असा दावाही महेश सावंत यांनी केला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. महेश सावंत म्हणाले, मी सदा सरवणकरांच्या मुलाविरुद्ध सुद्धा अपक्ष लढलो होतो. त्यावेळेस सुद्धा पावणे दोनशे मतांनी पडलो होतो. त्यावेळी ते सेनेच्या तिकिटावर होते, मी अपक्ष होतो. परंतु तो हिशोब शिल्लक होता. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, सदा सरवणकर माझे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आल्यानंतर सुद्धा मी लढलो. त्यांनी दोन वर्षांपूर्वी माझ्यावर फायरिंग देखील केली होती. पण आम्ही बाळासाहेबांना वचन दिलं होतं की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही माहीमवर भगवा फडकवणार होतो.