दुबई : अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अडखळत सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अंडर-१९ आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. दुसऱ्या बाजूला ज्या पाकिस्तान संघाने टीम इंडियाला पराभूत करत आशिया कप स्पर्धेत विजयी सलामी दिली होती त्यांचा मात्र सेमी फायनलमध्ये ‘गेम’ झालाय. दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशच्या संघानं पाकिस्तानचा पराभव करत फायलमध्ये जागा मिळवली आहे.
मोहम्मद अमानच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. भारताच्या या शानदार विजयात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वपूर्ण योगदान दिले.वैभवने अवघ्या ३६ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची तुफान खेळी केली. सलामीवीर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी झाली. आयुष म्हात्रेनं २८ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. वैभव सूर्यंवशी यानं कडक खेळी करत सलग दुसरी फिफ्टी झळकावली. त्याने ३६ चेंडूत ६७ धावांची दमदार खेळी केली. आंद्रे सिद्धार्थ याने २७ चेंडूत २२ धावा केल्या. आघाडीचे तीन फलंदाज सामना सेट करून माघारी फिरल्यावर कॅप्टन मोहम्मद अमान याने २६ धावांत नाबाद २५ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुला केपी कार्थिकेयानं १४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिला.यासह, भारतीय संघ ९व्यांदा अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे ते ९व्यांदा विजेतेपदावर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल.
अंडर-१९ आशिया कपमधील पहिला सेमीफायनल सामना बांगलादेश वि पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानचा संघ ३७ षटकांत अवघ्या ११६ धावा करत सर्वबाद झाला. तर प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने २३ षटकांत ११७ धावांचे आव्हान ३ विकेट्स गमावून पूर्ण केले. यासह आता अंडर-१९ आशिया कपमधील अंतिम सामना हा भारत अंडर-१९ विरूद्ध बांगलादेश अंडर-१९ संघांमध्ये होणार आहे. भारत आणि बांगलादेश या दोन संघात ८ डिसेंबरला फायनल सामना खेळवला जाईल. ही लढत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी आशिया कप स्पर्धेच्या फायनल लढतीला सुरुवात होईल.