मुंबई : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात रोकड, मद्य, मौल्यवान वस्तू, आणि इतर सामग्री जप्त केली आहे. निवडणुकीत पैशाचा गैरवापर थांबवण्यासाठी आयोगाने कडेकोट उपाययोजना राबवल्या. यावेळी दोन्ही राज्यांमध्ये एकूण १००० कोटी रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यात ८५८ कोटी रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. २०१९ साली महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये अनुक्रमे १०३.६१ कोटी आणि १८.७६ कोटी रुपये जप्त झाले होते, तर यावेळी जप्त रकमेचे प्रमाण सात पट वाढले आहे.
मतदारांना प्रलोभन टाळण्यासाठी सर्व निरीक्षकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यंदाच्या निवडणुकीत पैशाचा वाढलेला गैरवापर रोखण्यात आयोगाला यश आले आहे, मात्र या प्रमाणाने निवडणुकांतील आर्थिक शक्तीच्या गैरवापराचे गांभीर्यही समोर आले आहे. झारखंडमध्ये २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले, तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक झाली. दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी सांगितले की, मतदानाच्या आधी आणि प्रचार संपल्यानंतर कडक उपाययोजना करण्यात आल्या.