मुंबई : उत्तर प्रदेशमधील मथुरा या लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्या विरोधात काँग्रेस तगडा उमेदवार देणार आहे. हरियाणाचा ऑलिम्पियन बॉक्सर विजेंदर सिंग याला काँग्रेस मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे. यामुळे तिस-यांदा खासदारकीचे स्वप्न पाहणा-या हेमा मालिनी यांचे स्वप्न भंग होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मथुरा हा जाट बहुल मतदारसंघ असून आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदरने या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेस हायकमांडकडे केली होती, यामुळे काँग्रेसकडून विजेंदरला उमेदवारी देण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपने ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना मथुरेमधून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसचा मथुरेतून कोण उमेदवार असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, काँग्रेसकडून अनेक उमेदवार मथुरेतून लढण्यासाठी तयार होते मात्र, काँग्रेस सर्वांनाच धक्का देत विजेंदर सिंग यांना मथुरेतून निवडणूक लढवण्याची संधी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजेंदर जाट समुदायातून येतो, त्यामुळे काँग्रेसही जाट बहुल जागांवर जाट कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे. या दिवशी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या १०२ जागांवर मतदान होणार आहे.