धर्माच्या आधारावर विभागणी महाराष्ट्रात चालणार नाही, हे लक्षात आल्याने पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौ-यावर पळाले: राज बब्बर

0

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ‘कटेंगें बटेंगे’ चालणार नाही; भाजपा युतींच्या नेत्यांमध्येच मतभेद

*लोकसभेला उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने भाजपाला धडा शिकवला; या निवडणुकीतही भाजपा युतीला घरी बसवा.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने सर्वांनाच मान सन्मान, रोजीरोटी दिली आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न साकारले जाते. सर्व जातीधर्मांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्रात ‘कटेंगे बटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ सारख्या घोषणा देऊन फूट पाडण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करुन ‘कटेंगे बटेंगे’ वरून भाजपा व युतीतील नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनी सांगितले.

टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज बब्बर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे, संस्कृती, परंपरा आहे. या राज्याची मान सन्मान, प्रतिष्ठेला इतर राज्यातून येऊन कोणीही धक्का लावू शकत नाही. भाजपाने जातीधर्मात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण, पंकजा मुंडे यांनीही बटेंगें तो कटेंगे घोषणेला विरोध करत हे महाराष्ट्रात चालणार नाही असे म्हटले आहे. भाजपा युतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही द्वेष पसरवणारी भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फोडीफोडीचा डाव चालणार नाही हे लक्षात आल्यानेच पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौऱ्यावर गेले असे नाव घेता राज बब्बर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला. उत्तर प्रदेशात ३० जागा कमी केल्या तर महाराष्ट्रात १६ जागा कमी करुन त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाला धडा शिकवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन राज बब्बर यांनी केले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, चरणजित सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते निजामुद्दीन राईन आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech