वसई – वसई किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यातसुद्धा बिबट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसई पश्चिमेच्या भागात हा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत. या परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीने बिबट्याला धडक दिल्याचे वृत्त समजताच आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच किल्ल्याच्या परिसरात खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्ये कैद झाली असून बिबट्याचा वनविभागाकडून शोध सुरू आहे.
किल्ल्याला लागून नागरी वस्ती व कोळीवाडा आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी व सकाळी या भागातील रस्त्यावर नागरिक चालण्यासाठी जातात. आजूबाजूला घनदाट झाडे झुडपे असल्याने झुडपांमध्ये लपून बसलेला बिबट्या दिसत नाही. त्यामुळे नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातून ये जा करताना, रात्रीच्या वेळेस सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.