हे सरकार पुन्हा आले तर मंत्रालय देखील गुजरातला पळवतील
सरकार, भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करतय- आदित्य ठाकरे
नाशिक : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची आज ११३ नांदगाव विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश धात्रक ह्यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे आणि नाशिक शहरचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ नाशिक शहर येथे सभा पार पडली . या सभेत २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचेच, असा निर्धार केला आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला . तसेच प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला न्याय मिळेल, त्यांचे न्याय हक्क पूर्ण करू, असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि तरुणांना रोजगार, महिलांना सन्मान, शेतकऱ्यांना आधार
देण्यासाठी आपलं मत मशालीलाच ! असं आवाहनही केलं .
यावेळी गद्दारी केलेल्या आमदारांचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की लोकांच्या मनात भीती, गुंडाची भीती आहे, पण गद्दारांना धडा शिकवणार . तसेच आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर याद राखा . असा सज्जड दम देतानाच इथले दोन उमेदवार १०० कोटी, २०० कोटीच्या बाता करतायत . पण तुम्ही घरीच दादागिरी करा, आमच्या कार्यकर्त्यावर दादागिरी करू नका, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुजोर आमदारांना दिला .
महाराष्ट्रात मशाल पेटणार, तुतारी वाजणार, हात दिसणार
नांदगाव मधील भाषणात बोलताना ‘राज्यात आमचीच सत्ता येणार आहे, फक्त दहा दिवस बाकी आहे . भयमुक्त महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे . पन्नास खोके एकदम ओके, पण यांना आता नॉट ओके करायच आहे . आणि या गद्दारांना तिकीट कोणी दिले, यांना निवडून कोणी आणले ?, पण महाराष्ट्रात महा विकास आघडीचे बहुमताचे सरकार येणार आहे . महाराष्ट्रात मशाल पेटणार, तुतारी वाजणार, हात दिसणार . असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .
सरकार, भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करतय- आदित्य ठाकरे
शेतकऱ्यांचा मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की महा विकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली, १५०० रुपये देतात, आणि देवा भाऊ देवा भाऊ करतात . हे १५ लाख देणार होते, पण आता केवळ १५०० रुपये देतायत . योगी सरकारने ३०० रुपयांचे चेक वाटले . यांचं सरकार पुन्हा आलं तर हे सरकार १५० रुपये देतील काही दिवसांनी . पण आम्ही नुसते बोलत नाही, आम्ही करून दाखवतो . या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली, मात्र जाचक अटी लावल्या, जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आली तेव्हा आपले मंत्री नेते गावागावात पोहोचले, मदत केली . पण या सरकारच्या काळात आपत्ती आली, तेव्हा अब्दुल गद्दार आले होते का, आताचे कृषी मंत्री आले का कधी ? या सरकार मध्ये कृषी मंत्री कोण हेच माहिती नाही . मंत्रीच निकम्मा, निष्क्रिय आहे, तो कोणालाच माहीत नाही . असं टीकास्त्र सोडतानाच तीन लाखांचे कर्ज आपण माफ करणार, शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन भत्ता आमचे सरकार देणार . आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत . अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली .
हे सरकार पुन्हा आले तर मंत्रालय देखील गुजरातला पळवतील
राज्यातील बेरोजगारीवर बोलताना “या सरकारने बेरोजगार तरुणांचे रोजगार गुजरात मध्ये नेले . सगळ्या कंपन्या गुजरातला नेल्या . मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्राचे नाही तर गुजरातचे आहेत . महाराष्ट्र आपला आहे, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या ही आमची भूमिका . त्यामुळे महाराष्ट्रात प्रकल्प यावे ते कुठेही दिले तरी चालतील ही आपली भूमिका आहे, असं स्पष्ट करतानाच वेदांता गुजरातला नेले, अवकाळी सरकार आमच्या डोक्यावर बसवले . बहुमताचे सरकार, भाजप प्रणित सरकार असतांना एकही रोजगार महाराष्ट्रात आणला नाही . भाजप गुजरात मध्ये रोड शो करतेय, प्रकल्प पळवल्यामुळे . पण हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर मंत्रालय देखील गुजरातला पळवतील . असा घणाघात आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी केला .