विशेष निवडणूक निरीक्षकांकडून ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

0

ठाणे : येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष ‍निवडणूक निरीक्षक (निवडणूक खर्च) बी.आर. बालकृष्णन यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ठाणे हा राज्यातील महत्वाचा जिल्हा असल्याने सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, 18 विधानसभा निवडणूक मतदारसंघांसाठी नियुक्त केलेले केंद्रीय खर्च निरीक्षक आशिषकुमार पांडेय, रविंदर सिंधू, सुरेंद्र पाल, जी मनीगंडासामी, जिल्हा समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर. बालकृष्णन यांनी निवडणूक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच पोलीस, एसएसटी, एफएसटी, राज्य उत्पादन शुल्कामार्फत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई याबाबतची माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईत सापडलेला अवैध मद्यसाठा, तसेच अनधिकृतपणे ने-आण करण्यात असलेल्या रोख रक्कम याबाबतचा आढावा देखील त्यांनी घेतला. तसेच आतापर्यंत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून गोवा, दमण येथून अवैधरित्या येत असलेला मद्यसाठा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथील हातभट्ट्यावरुन होणारी मद्याची अवैध विक्री याबाबतचा आढावा घेत असताना कारवाई दरम्यान ड्रोनचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. तसेच रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या तपासणीचा आढावा घेत असताना रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या व संशयास्पदरित्या आढळणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर बालकृष्णन यांनी एकूणच जिल्ह्यात विविध पथकांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेत असतानाच सी-व्हीजीलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकारण याबाबतची माहिती जाणून घेतली. विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सूचित केले. मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असून सर्वांनी 24 तास सतर्क राहून पूर्ण क्षमतेने काम करावे व संपूर्ण मतदान प्रक्रिया उत्साही वातावरणात सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech