मुंबई – “विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात होत असलेली लढाई ही स्थगिती विरुद्ध प्रगतीची लढाई आहे. त्यामुळे प्रगतीच्या बाजूने मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेने उभे रहावे”, असे आवाहन भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी शनिवार, दि. २ नोव्हेंबर रोजी केले. कुर्ला विधानसभेतील महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आमदार शेलार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुषम सावंत आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मंगेश कुडाळकर यांच्यासारखा तळमळीने काम करणारा आमदार कुर्ला वासीयांना लाभला आहे. त्यांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
आ. आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे जेव्हा तुमच्याकडे मत मागायला येतील, तेव्हा त्यांना विचारा, मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी केलेली पाच कामे दाखवा. त्यांनी फक्त एकच काम केले, ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्थगिती दिली. मेट्रो, बुलेट ट्रेनला स्थगिती, कोस्टल रोडला विरोध. उलट महायुती सरकार सत्तेत येताच हे सगळे प्रकल्प मार्गी लागले. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो, देशातील पहिली भुयारी मेट्रो, अशी अगणित कामे सांगता येतील.
याकूब मेमनची भलामण करणारे उद्धव ठाकरेंना प्यारे
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनची भलामण करणारे उद्धव ठाकरेंना प्रिय वाटू लागले आहेत. ज्या याकूबने रत्नागिरीमार्गे मुंबईत आरडीएक्स मुंबईत पोहोचवले, ज्यामुळे हजारो मुंबईकरांचे जीव गेले, ज्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली, त्या याकूब मेमनला शिक्षा देऊ नका, अशी मागणी ज्या काँग्रेसने केली त्यांच्याबरोबर उबाठा गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे तुमच्याकडे मत मागायला आले, की त्यांना हा सवाल विचार, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले.
चांदीवलीतून जितू चौधरी यांची माघार
आमदार आशिष शेलार यांच्या शिष्टाईनंतर चांदीवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जितू चौधरी यांनी माघार घेतली. यावेळी महायुतीचे उमेदवार दिलीप लांडे आणि भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुषम सावंत उपस्थित होते. याविषयी माहिती देताना शेलार म्हणाले, “समस्त चौधरी समाजाला सोबत घेऊन चांदीवली मतदारसंघात प्रखर राष्ट्रवाद रुजवण्याचे कार्य करणारे जितूभाई चौधरी हे एक राष्ट्रभक्त आहेत. येत्या निवडणुकीनंतर प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सरकार स्थापन करण्यासाठी एकेका जागेची नितांत गरज आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतविभाजन टाळण्यासाठी त्यांनी नामांकन अर्ज मागे घ्यावे, अशी विनंती मी त्यांना केली होती. त्यानुसार त्यांनी घेतली”.