पालघरमध्ये राजकीय गोंधळ: बंडखोरी, उमेदवार गायब

0

पालघर – पालघर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची नाराजी, बंडखोरी आणि उमेदवारांच्या ‘गायब’होण्याच्या घटनांनी राजकीय वातावरणात तणाव निर्माण केला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील अंतर्गत तणाव उफाळून आला असून, त्याचे पडसाद उमेदवारांवर दिसत आहेत.

शिवसेना नेते श्रीनिवास वनगा यांना तिकीट न मिळाल्याने ते ‘नॉट रिचेबल’ झाले होते. याच दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी नेते आणि माजी उपाध्यक्ष जगदीश धोडीही तीन दिवसांपासून संपर्कात नाहीत. धोडी यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते नाराज असल्याचंही बोललं जातं, कारण शिवसेना आणि भाजपकडून स्थानिक कार्यकर्त्यांना सोडून भाजपमधून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या घटनांमध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हेही गायब झाले आहेत. घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत माजी खासदार राजेंद्र गावीत यांच्याविरोधात अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते दोन दिवसांपासून संपर्कात नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार घोडा यांच्यावर वरिष्ठ नेत्यांचा दबाव असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर सतत फोनद्वारे समजावलं जात आहे.या घटनांनी पालघरमधील शिवसेनेत असंतोष वाढत आहे. भाजपसोबतच्या युतीतून आयात केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याने स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या सर्व गोंधळामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हे आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी अडचण बनू शकते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech