बांदा – उत्तर प्रदेशातील बांदा येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी मुख्तार अन्सारी याचा मृत्यु विषप्रयोगाने झाल्याचा आरोप त्याच्या मुलाने केला असून आता त्याच्या मृत्युची चौकशी करण्यात येणार आहे. त्रिसदस्यीय समितीकडून ही चौकशी करण्यात येणार आहे.
मुख्तार अन्सारी याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल होते. त्यातल्या दोन गुन्ह्यांमध्ये तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मंगळवारी रात्री त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी त्याचे रुग्णालयात निधन झाले. कारागृहातील जेवणातून आपल्याला विष देण्यात येत असल्याचा आरोप त्यानेही याआधी केला होता. विषप्रयोगामुळेच त्याचा मृत्यु झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केल्यानंतर त्याच्या शवविच्छेदन करताना त्याचा व्हिडिओ काढण्यात येणार असून त्याचा व्हिसेरा जतन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मुख्तार अन्सारीचे भाऊ आणि गाझीपुरचे खासदार अफझल अन्सारी यांनीही त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्याला कारागृहात विष देण्यात आल्याचा आरोप प्रशासनाने फेटाळला आहे.