सोलापूर – खेड शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदी दरम्यान सापडलेल्या गाडीमधील पैसे व त्या गाडीचा माझा काहीही संबंध नाही, असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.सांगोल्यातील असलेल्या मोटारीतून पाच कोटी रुपये घेऊन जात असताना खेड शिवापूर या टोल नाक्यावर ही गाडी टोल नाक्यावर पकडण्यात आली होती. ही गाडी आमदार शहाजी पाटील यांच्या संबंधित असून सांगोला मतदारसंघातच हे पाच कोटी रुपये जात असल्याचे सगळीकडे चर्चिले जात होते. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही ही गाडी काय झाडी, काय डोंगर या आमदाराच्या मतदारसंघात पैसे घेऊन जात असून, ती आमदार शहाजी पाटील यांच्या संबंधित असल्याचे सांगितले होते.
या सर्व चर्चेनंतर आज पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की खेड शिवापूर येथे नाकाबंदी दरम्यान पकडलेली गाडी माझी किंवा माझ्या कुटुंबीयांशी संबंधित नाही. त्या गाडीतील पैशाबाबत मला काहीही माहिती नाही. संजय राऊत यांना रात्री डोंगर व दिवसा फक्त झाडीच दिसत आहेत. या गाडीचे मालक शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असल्याचेही आमदार शहाजी पाटील यांनी बोलून दाखवले. ही गाडी सांगोल्यातील असल्यामुळे गाडीविषयी व पैशाविषयी सगळीकडे चर्चांना मात्र उधाण आले आहे.