नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत संवाद साधला. या दोघांमध्ये फ्री-व्हीलिंग चॅट एआयपासून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपर्यंत आणि हवामानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. ‘मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही. मात्र लहान मुलांसारखे तंत्रज्ञान खूप आवडते, असे नरेंद्र मोदी बिल गेट्स यांच्याशी बोलताना म्हणाले.
यावेळी बिल गेट्स यांनी तंत्रज्ञाच्या वेगवान क्षमतेबद्दल भारतीयांचे कौतुक केले, तर पंतप्रधान मोदीं म्हणाले की, एआयने आपल्यासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. एआय ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु, उत्तम प्रशिक्षणाशिवाय अशी गोष्ट एखाद्याच्या हातात दिली तर त्या गोष्टीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. मी एआयशी संबधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांशी बोललो. त्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सुरुवातीच्या काळात तरी एआय जनरेटेड गोष्टींवर (एआयचा वापर करून तयार केलेली सामग्री, जसे की फोटो, व्हिडीओ, संगीत आणि डॉक्यूमेंट्स) वॉटरमार्क असायला हवा. ही सामग्री एआयच्या माध्यमातून बनवली असल्याचे लोकांना कळायला हवे. जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही. असे करणे काही वाईट नाही. ही गोष्ट केवळ एआय जनरेटेड आहे हे लोकांना सांगायलाच हवे. त्यामुळे त्या युजरला किंवा उपभोक्त्याला त्या गोष्टीची खरी किंमत कळेल.
मोदी यांनी रिसायकलिंग करून बनवलेल्या त्यांच्या जॅकेटबद्दलची माहिती यावेळी बिल गेट्स यांना दिली. मोदी यांनी सांगितले की, त्यांचे जॅकेट रिसायकल केलेल्या सामग्रीचे बनलेले आहे. हे जाकीट टेलरकडे मिळणाऱ्या वाया गेलेल्या कापडापासून बनवले जाते, म्हणजे टाकाऊ कापड. यामध्ये जुन्या कपड्यांचाही वापर करण्यात आला आहे. त्यात ३० ते ४० टक्के टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचाही वापर करण्यात आला आहे. या सर्व साहित्यापासून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे.