मुंबई – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड अधिकृत असल्याचा निकाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यापूर्वीच दोन वेळा दिलेला आहे. या निर्णयास मागील 12 वर्षात कुठेही कायदेशीर आडकाठी आलेली नाही. कोणत्याही न्यायालयात या अध्यक्ष पदास आव्हान देण्यात आलेले नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दोन वेळा रामदास आठवले यांच्या बाजुने दिलेला निकाल ग्राह्य मानून राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणून रामदास आठवले यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष रामदास आठवले असून त्यांच्या अध्यक्षतेत पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे कामकाज अधिकृत चालले आहे. रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून शिफारसी करतील, त्या शिफारसी अनधिकृत असल्याने स्विकारू नयेत. या बाबतचे पत्र राज्य शासनाने सर्व विद्यापीठांना पाठवले आहे. याबाबतची माहिती आज रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. गरवारे क्लब येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणून रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पिपल्स एज्युकेशन सोसायटीतील गटबाजीला आता पूर्णविराम मिळेल. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुंबई, नवी मुंबई, महाड, पुणे, कोल्हापुर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बेंगलोर, बुध्दगया (बिहार) या ठिकाणी अनेक शैक्षणिक संकुल आणि वसतीगृहे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पी.ई.एस.या संस्थेचा आम्ही विकास करणार आहोत. राज्यात सर्व जिल्ह्यांत जमीन मिळवून विविध महाविद्यालये सुरू करणार आहोत. राज्याबाहेर अन्य राज्यांत सुद्धा जमीन मिळवून संस्थेचा अधिक विकास करणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरीब मुलांना पुर्व प्राथमिकपासून इंग्रजी माध्यमांचे चांगले शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमवा आणि शिका या तत्वावरही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभे करण्याचा आमचा मानस आहे, असे रामदास आठवले या वेळी म्हणाले.
रामदास आठवले हे पी.इ.एस चे अध्यक्ष आहेत. याशिवाय आठवले यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, विश्वस्त सदस्यपदी पद्मश्री ऍड. उज्जवल निकम, जस्टीस सुरेंद्र तावडे, ऍड. बाबुराव बर्वे, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. सुनिल खापरडे, अरविंद सोनटक्के, प्रो.एस.एल भागवत, डॉ.एम.व्यंकट स्वामी तर सचिवपदी डॉ.वामन आचार्य आहेत, अशी कार्यकारणी कार्यरत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 11 पैकी 4 सदस्य हे सवर्ण समाजाचे आणि 7 सदस्य दलित समाजाचे घेण्याचा नियम संस्थेच्या घटनेत केलेला आहे. पी.इ.एस च्या शाळा,कॉलेज, मध्ये केवळ दलितांचीच मुले नाही तर सर्व समाजातील गरिब मुलांना शिक्षणाची संधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली. या संस्थेचे पहिले संस्थापक अध्यक्ष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर त्यांचे पुत्र यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर जस्टिस आर आर भोळे, बसव लिंगप्पा, रंगनाथन, प्रितमकुमार शेगावकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर 2 जुलै 2012 रोजी रामदास आठवले हे पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे मेंबर आणि अध्यक्ष झाले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणून रामदास आठवले यांच्या नावास दोन वेळा अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासनानेही रामदास आठवले यांच्या नावास अधिकृत मान्यता दिली असुन त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने राज्यभरातील विद्यापीठांना दिलेला आहे. आता संस्थेत कोणतेही वाद नसून गटबाजीही नाही. सर्वांनी डॉ बाबसाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन संस्थेस कोणतेही राजकारण करून अडचण न करता सहकार्य करावे, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.